Friday, January 8, 2016

मंकी बात - प्रस्तावना

 

मंकी बात - प्रस्तावना

आता तुम्ही म्हणाल की ब्लॉगचं  हे नाव असं कसं! याचं मी सगळ्यात जुनं आणि सोपं उत्तर चिकटवून माझी सुटका करवून घेऊ शकतो आणि ते म्हणजे 'नावात काय ठेवलंय?' पण हे नाव असण्यामागे बरेच पैलू असू शकतात. पहिला म्हणजे स्वतःवरून प्रामाणिकपणे दिलेलं नाव (monkey business), किंवा तथाकथित पुरोगाम्यांनी केलेल्या 'भक्त' कॅटेगरीत पण तुम्ही मला टाकू शकता (तसेही संदीप खरे म्हणतात तसे अदृश्य शेंडी आहेच की माझ्या मानेवर) आणि त्या प्रभावात दिलेलं नाव असही म्हणू शकता, किंवा एखाद्या बंडखोरासारखा (भाषेचाच बंडखोर बरं का) मी पण प्रतिप्रश्न करू शकतो की ''मंदार' या शब्दाप्रमाणे 'मन की' ला 'मंकी' असे का नाही लिहू शकत?' पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर यातलं काहीच नाही किंवा सर्व काही किंवा अक्षरशः 'मेरी मर्जी' म्हणा हवा तर! होय, कदाचित हेच खरंय! आता लेखमालिकेला (ब्लॉग्सला) काहीतरी शीर्षक तर द्यायचंच होतं; तर हे शीर्षक मनात आलं, मजेशीर (आणि थोडंस) अर्थपूर्णही वाटलं; देऊन टाकलं!! म्हटलं ब्लॉगच्या प्रस्तावनेत तेवढ्याच चार ओळी अजून लिहिता येतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कुठे कोणती रजिस्ट्री करायची आहे या नावाने! त्यामुळे उद्या बदलावं वाटलंच तर पैसे थोडीच लागणारेत. असो. (नावाबद्दलचं फूटेज् संपलं).

तर खूप खूप दिवसांपासून, खरं तर वर्षांपासून (हे वाक्य लिहितांना आत्ता जाणवलं आणि दुखःही झालं की इतके मोठे झालो आहोत आपण की आता संदर्भ  वर्षांमधे येत आहेत) वाटत होतं की मी काहीतरी लिहावे पण तसा योग येत नव्हता. ('आळस होता' हे म्हणण्यापेक्षा थोडं सोपं, sophisticated आणि वजनदार वाटतं नाही म्हणायला). तो योग जुळून आला ते (कतार येथील, आमच्या) महाराष्ट्र मंडळाने त्रैमासिकासाठी सगळ्यांकडून लेख मागविले तेंव्हा. दिप्तीने (माझ्या बायकोने) सांगितले की कोणी लिहिणारं असल्यास त्याला सांग. तेंव्हा माझ्यातल्या नसलेल्या लेखकातला (आणि असलेल्या नवऱ्यातला) इगो जागा झाला आणि तिला म्हणालो, 'कोणी कशाला, तुला वाटत नाही का की मी लिहू शकेल म्हणून?' तिला 'हो' म्हणायला खूप जड चाललंय हे मी तिच्या चेहऱ्यावरून वाचू शकत होतो (तसेही नवरे बायकोचा चेहरा वाचण्यात एक्स्पर्ट असतात नाही) पण बिचारी माझं मन राखण्यासाठी (किंवा माझा आवेश पाहून पुढचा एक वाद टाळण्यासाठी) म्हणाली की तू तर लिहिशीलच रे पण अजून कोणी असेल तर त्याला पण सांग. आणि अशाप्रकारे मीच कुऱ्हाडीवर पाय मारून घेतला.

जसा जसा लेख द्यायचा शेवटचा दिवस जवळ येत होता तसं तसं वाटत होतं की 'एवढ्या आत्मविश्वासाने (योग्य शब्द - तोंड वर करून) बोलून तर गेलो पण ते आता निस्तारणार कसं?'. आणि शेवटी माझ्या हातून माझा पहिला लेख (शीर्षक: पहिला(च) दिवस) लिहिल्या जाण्याचा योग एकदाचा जुळला. नाहीतर बायकोला (वर करून बोललेलं) तोंड दाखवायची पण सोय नव्हती. आणि मी माझा लेख, महाराष्ट्र मंडळाला, (इंजिनीरिंगला असताना घेतलेल्या प्रतिज्ञेला जागत), अक्षरशः शेवटच्या तारखेला कसाबसा पाठवला.

हे सगळं संगण्यामागचा हेतू एवढाच की या लेखमालिकेचा (ब्लॉगचा) जन्म, त्यामागच्या संवेदना आणि प्रसववेदना तुमच्यापर्यंत पोहोचवणे. हवं तर एक Disclaimer म्हणा जे तुम्हाला माझ्याकडून खूप चांगलं असं काही लिहिलं जाण्याची अपेक्षा ठेऊ नका हे सांगतंय किंवा मेरी नाजायज़ औलाद (माझा पहिला लेख, जो ब्लॉग तयार करायच्या आधी लिहिला गेलाय, आणि म्हणून नाजायज़) को जायज़ करने की एक कोशिश!!

आजकाल या ब्लॉगसाईट्स, फे. बु. मुळे (माझ्यासारख्या) हंगामी लेखकांचे पेव फुटले आहे. पण बिचाऱ्यांना हीच तर एक जागा आहे जिथे काहीही बोलण्यास (लिहिण्यास) कोणीही (ना बॉस, ना बायको) थांबवू शकत नाही, पैसेही लागत नाही, मन मोकळे करायला चढलेलीही असावी लागत नाही आणि तरीही बिनधास्त म्हणता येते 'मेरी मर्जी'!!

ता. क. अजून त्रैमासिक प्रसिद्ध झाले नाहीए त्यामुळे पहिल्या लेखाच्या भवितव्यावर आणि पर्यायाने दर्जावर  प्रश्नचिन्ह आहेच.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home