Friday, January 8, 2016

पहिला(च) दिवस


प्रत्येकाला देश विदेशात प्रवास करताना अनेक चांगले-वाईट अनुभव येतातच. काही अनुभव काही शिकवण देऊन जातात; काही आजही आठवले तर खळखळून हसवून जातात. पण या सगळ्या अनुभवात मनात विशेष घर करून राहिलेले असतात ते पहिल्या परदेश प्रवासाचे अनुभव; जे कधीच विसरले जाऊ शकत नाही!

पहिला(च) दिवस


पहिली कंपनी जॉईन केल्यावर जेमतेम सात महिने झाले आणि 'लवकरच सिंगापुरला जावे लागणार आहे', असे कळाले. पण आमच्या कंपनीत 'जावे लागणार' हे कळणे आणि actually 'जाणे' यातले अंतर कितीही असू शकते. अक्षरशः विमानतळावरून परत बोलवून घेतल्याचे किस्से पण प्रसिद्ध आहेत. असो. तर शेवटी जायचे-नाही जायचे, visa मिळेल - नाही मिळणार, असे एक एक अडथळे पार होत होत पुढच्या एक महिन्यातच आमची गाडी शेवटी तिकीट बुक करण्यापर्यंत पोहोचली आणि सोमवारी स. ९:०० वा. पोहोचायच्या सिंगापूरच्या ऑफिससाठी मी भारतातल्या रविवारी रात्री १२:३० (म्हणजे सोमवार ००:३०) च्या विमानाचे तिकीट आमच्या admin ला बुक करायला सांगितले. काही अनुभवी लोकांनी jet lag आणि झोपेचा त्रास होऊ नाही म्हणून एक दिवस आधी जाण्याचा सल्ला दिला पण आम्हाला असा रात्रीचा प्रवास करून सकाळी लगेचच ऑफिसला जायची नेहमीची सवय आहेच की, असा (अति) आत्मविश्वास असल्याकारणाने अशा भेकड सल्ल्याने न डगमगता आम्ही आमच्याच ठरवलेल्या वेळेवर प्रवास करायचा ठरवला.
सगळे काही ठरल्याप्रमाणे पार पडून स. ७:३० वा. सिंगापुर ला पोहोचलो आणि ९:०० वा. ऑफिस मध्ये हजर. तेंव्हा स्वतःचीच पाठ थोपटून घेतली (उगीचच लोकं काहीही सल्ले देतात असा विचारही मनात येऊन गेला). तिथल्या नवीन बॉसशी, नवीन लोकांशी आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेत लंच टाईम कधी झाला काही कळलं नाही आणि तोपर्यंत एकदम फ्रेश पण वाटत होते. पण एकदा जेवण झाल्यानंतर पापण्यांवर कित्ती कित्ती मणाचे ओझे मी वाहत आहे अशी माझी परिस्थिती झाली. इतरांशी बोलतांनाही माझे डोळे बंद होत होते. अर्थातच माझ्या (प्रेमळ) बॉस च्या उघड्या डोळ्यातून हे काही सुटले नाही आणि २:०० वा. तोच बिचारा न रहावून म्हणाला की एक तास कसा तरी काढ अजून आणि नंतर घरी गेलास तरी चालेल (actual वेळ ६:०० पर्यंत). आणि शप्पथ सांगतो की, त्या 'एका दिवसाएवढ्या वाटणाऱ्या' एका तासा मध्ये, तो प्रत्येक जण ज्याने मला एक दिवस आधी जाण्याचा सल्ला दिला होता माझ्या अर्धवट उघड्या डोळ्यांसमोर येऊन गेला आणि तेंव्हा jet lag हा नक्की काय प्राणी/रोग/विकार असतो याची प्रचिती आली. मी शपथेवर सांगू शकतो की परत असे धाडस आजपर्यंत कधी केले नाही.
दु. ३:०० वाजताच (३ च्या पुढचे ०० पण महत्वाचे), ऑफिस मधून निघून घरी गेलो आणि आराम करून संध्याकाळी दुकानात जाण्यासाठी बाहेर पडलो. दुकान, घरासमोरचा रस्ता क्रॉस करून, जवळच होते. रस्ता क्रॉस करायला झेब्रा क्रॉसिंग जवळ गेलो आणि पादच्यार्यांसाठी असलेला सिग्नल लाल असेल तर थांबायचे हे माहित असल्याने तो सिग्नल हिरवा होण्याची वाट पहात थांबलो. बराच वेळ झाला तरी सिग्नल काही हिरवा झाला नाही. (तेंव्हा मनात आले उगीचच आपण आपल्या देशाला नावं ठेवतो. परदेशात पण अश्या न चालणाऱ्या गोष्टी आहेतच की) तेवढ्यात तेथे एक माणूस माझ्या जवळ आला आणि माझ्या जवळच्या सिग्नलच्या खांबावरचे एक बटण दाबून त्याने तो सिग्नल हिरवा करवून घेतला. आता ते बटण दाबून तो सिग्नल लाल चा हिरवा आपण स्वतःहून करवून घ्यायचा असतो हे काय मला तिथल्या पंतप्रधानाने स्वप्नात येऊन सांगितले का? आपल्या पुण्यात पहा बरं, कमीत कमी ५ सूचना असलेल्या किमान २ पाट्या तरी असल्या असत्या तेथे.
असो, शेवटी दुकानात पोहोचलो एकदाचा. तिथे अतिशय सुरकुत्या पडलेली आजी दुकानदार होती. तिला मी विचारले, Do you have mobile recharge card? तर ती हुंदके दिल्यासारख्या आवाजात तॉ अ का असं काहीतरी म्हणाली. तिच्या त्या हेल काढल्याचा सुरा वरून तिने मला काहीतरी विचारले असा अंदाज बांधुन मी परत म्हणालो, No No mobile recharge card. यावर तिचे परत तेच उत्तर, प्रश्न किंवा आवाज, काहीही म्हणा. आता हा पेच तोडायचा कसा या पेचात मी होतो. जे होईल ते पाहून घेऊ असा विचार करून शेवटी मी तिला फक्त  "yes yes" म्हणालो आणि काय आश्चर्य!! तिने खरच मला जे पाहिजे होते तेच आणून दिले! त्या कार्ड चे नाव वाचल्यावर कळाले की top up card चा तॉ अ का हा असा म्हातारपण आणि chinese accent यांचं मिश्रण होऊन तयार झालेला एक उच्चार आहे. तो एक माझ्यासाठी 'युरेका' क्षण ठरला!!

मंकी बात - प्रस्तावना

 

मंकी बात - प्रस्तावना

आता तुम्ही म्हणाल की ब्लॉगचं  हे नाव असं कसं! याचं मी सगळ्यात जुनं आणि सोपं उत्तर चिकटवून माझी सुटका करवून घेऊ शकतो आणि ते म्हणजे 'नावात काय ठेवलंय?' पण हे नाव असण्यामागे बरेच पैलू असू शकतात. पहिला म्हणजे स्वतःवरून प्रामाणिकपणे दिलेलं नाव (monkey business), किंवा तथाकथित पुरोगाम्यांनी केलेल्या 'भक्त' कॅटेगरीत पण तुम्ही मला टाकू शकता (तसेही संदीप खरे म्हणतात तसे अदृश्य शेंडी आहेच की माझ्या मानेवर) आणि त्या प्रभावात दिलेलं नाव असही म्हणू शकता, किंवा एखाद्या बंडखोरासारखा (भाषेचाच बंडखोर बरं का) मी पण प्रतिप्रश्न करू शकतो की ''मंदार' या शब्दाप्रमाणे 'मन की' ला 'मंकी' असे का नाही लिहू शकत?' पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर यातलं काहीच नाही किंवा सर्व काही किंवा अक्षरशः 'मेरी मर्जी' म्हणा हवा तर! होय, कदाचित हेच खरंय! आता लेखमालिकेला (ब्लॉग्सला) काहीतरी शीर्षक तर द्यायचंच होतं; तर हे शीर्षक मनात आलं, मजेशीर (आणि थोडंस) अर्थपूर्णही वाटलं; देऊन टाकलं!! म्हटलं ब्लॉगच्या प्रस्तावनेत तेवढ्याच चार ओळी अजून लिहिता येतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कुठे कोणती रजिस्ट्री करायची आहे या नावाने! त्यामुळे उद्या बदलावं वाटलंच तर पैसे थोडीच लागणारेत. असो. (नावाबद्दलचं फूटेज् संपलं).

तर खूप खूप दिवसांपासून, खरं तर वर्षांपासून (हे वाक्य लिहितांना आत्ता जाणवलं आणि दुखःही झालं की इतके मोठे झालो आहोत आपण की आता संदर्भ  वर्षांमधे येत आहेत) वाटत होतं की मी काहीतरी लिहावे पण तसा योग येत नव्हता. ('आळस होता' हे म्हणण्यापेक्षा थोडं सोपं, sophisticated आणि वजनदार वाटतं नाही म्हणायला). तो योग जुळून आला ते (कतार येथील, आमच्या) महाराष्ट्र मंडळाने त्रैमासिकासाठी सगळ्यांकडून लेख मागविले तेंव्हा. दिप्तीने (माझ्या बायकोने) सांगितले की कोणी लिहिणारं असल्यास त्याला सांग. तेंव्हा माझ्यातल्या नसलेल्या लेखकातला (आणि असलेल्या नवऱ्यातला) इगो जागा झाला आणि तिला म्हणालो, 'कोणी कशाला, तुला वाटत नाही का की मी लिहू शकेल म्हणून?' तिला 'हो' म्हणायला खूप जड चाललंय हे मी तिच्या चेहऱ्यावरून वाचू शकत होतो (तसेही नवरे बायकोचा चेहरा वाचण्यात एक्स्पर्ट असतात नाही) पण बिचारी माझं मन राखण्यासाठी (किंवा माझा आवेश पाहून पुढचा एक वाद टाळण्यासाठी) म्हणाली की तू तर लिहिशीलच रे पण अजून कोणी असेल तर त्याला पण सांग. आणि अशाप्रकारे मीच कुऱ्हाडीवर पाय मारून घेतला.

जसा जसा लेख द्यायचा शेवटचा दिवस जवळ येत होता तसं तसं वाटत होतं की 'एवढ्या आत्मविश्वासाने (योग्य शब्द - तोंड वर करून) बोलून तर गेलो पण ते आता निस्तारणार कसं?'. आणि शेवटी माझ्या हातून माझा पहिला लेख (शीर्षक: पहिला(च) दिवस) लिहिल्या जाण्याचा योग एकदाचा जुळला. नाहीतर बायकोला (वर करून बोललेलं) तोंड दाखवायची पण सोय नव्हती. आणि मी माझा लेख, महाराष्ट्र मंडळाला, (इंजिनीरिंगला असताना घेतलेल्या प्रतिज्ञेला जागत), अक्षरशः शेवटच्या तारखेला कसाबसा पाठवला.

हे सगळं संगण्यामागचा हेतू एवढाच की या लेखमालिकेचा (ब्लॉगचा) जन्म, त्यामागच्या संवेदना आणि प्रसववेदना तुमच्यापर्यंत पोहोचवणे. हवं तर एक Disclaimer म्हणा जे तुम्हाला माझ्याकडून खूप चांगलं असं काही लिहिलं जाण्याची अपेक्षा ठेऊ नका हे सांगतंय किंवा मेरी नाजायज़ औलाद (माझा पहिला लेख, जो ब्लॉग तयार करायच्या आधी लिहिला गेलाय, आणि म्हणून नाजायज़) को जायज़ करने की एक कोशिश!!

आजकाल या ब्लॉगसाईट्स, फे. बु. मुळे (माझ्यासारख्या) हंगामी लेखकांचे पेव फुटले आहे. पण बिचाऱ्यांना हीच तर एक जागा आहे जिथे काहीही बोलण्यास (लिहिण्यास) कोणीही (ना बॉस, ना बायको) थांबवू शकत नाही, पैसेही लागत नाही, मन मोकळे करायला चढलेलीही असावी लागत नाही आणि तरीही बिनधास्त म्हणता येते 'मेरी मर्जी'!!

ता. क. अजून त्रैमासिक प्रसिद्ध झाले नाहीए त्यामुळे पहिल्या लेखाच्या भवितव्यावर आणि पर्यायाने दर्जावर  प्रश्नचिन्ह आहेच.